Wednesday, February 25, 2026
लिपिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
लिपिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा...

अलिबाग ; लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय व अधिकारी व कर्मचारी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. संघटनेच्या माध्यमातून १६ फेब्रुवारीपासून निदर्शने तसेच इतर आंदोलन करण्यात येत आह. मात्र संघटनेच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सोमवारी (दि.२३) संघटनेच्या नेतृत्वाखाली लिपिक अधिकारी व कर्मचारी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी किशन जावळे यांना देण्यात आले आहे.

लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी चौथ्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणीत असलेली तफावत दुर करुन सुधारित वेतन श्रेणी लागू करावी तसेच जशास तशी जुनी पेन्शन लागू करावी या मागण्यांसह लिपीक संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. आपल्या मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलन करूनही आश्वासनाच्या पलीकडे काहीही लागले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष धुमसत आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याच्या पूर्ततेसाठी जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय व अधिकारी व कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. २३ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून, अधिवेशन कालावधीत लिपिक अधिकारी व कर्मचारी असहकार धोरण स्वीकारतील. यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होईल, याबाबत कर्मचाऱ्यांना जबाबदार धरू नये असेही संघटनेने दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx