अलिबाग : अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मध्ये शेकाप, काँग्रेस आघाडी व भाजप, शिवसेना (शिंदे गट) युतीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दंड थोपटले असून, शिवसेना शहर प्रमुख संदीप पालकर व श्वेता पालकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी (दि.१७) आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे प्रभाग क्रमांक ४ मध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर लढणार असून, प्रभागातील नागरिकांचा पाठिंबा लाभत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे मत संदीप पालकर यांनी व्यक्त केले.
अलिबाग नगरपरिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सोमवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संदीप पालकर व श्वेता पालकर यांनी प्रभाग क्रमांक ४ मधून आपले उमेदवारी अर्ज, निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम पाटील यांच्याकडे दाखल केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, अलिबाग तालुका प्रमुख शंकर गुरव, मुरुड तालुकाप्रमुख नौशाद दळवी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभागाच्या विकासासाठी मी अनेक उपक्रम राबविले आहेत. यापुढेही प्रभागाच्या विकासासाठी जे आवश्यक आहे ते मी करण्याचा प्रयत्न करेन. या प्रभागातील जनता आमच्यापाठी उभी असून, जनता आम्हाला नक्कीच निवडून देईल.
: संदीप पालकर
प्रभाग क्रमांक ४ उमेदवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मागील पाच वर्षांपासून संदीप पालकर व श्वेता पालकर प्रभागात विविध विकासकामे करीत आहेत. यामुळे मतदार स्वतः भेटून आम्ही तुमच्या पाठी आहोत असे त्यांना सांगत आहेत. यामुळे प्रभाग क्रमांक ४ मध्ये आमचे दोन्ही उमेदवार विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे.
: सुरेंद्र म्हात्रे
जिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx