Saturday, December 27, 2025
अलिबाग नगरपरिषद निवडणूक शेकापसमोर आपला गड अबाधित ठेवण्याचे आव्हान
अलिबाग नगरपरिषद निवडणूक शेकापसमोर आपला गड अबाधित ठेवण्याचे आव्हान...

अलिबाग : अलिबाग शहर हा शेकापचा बालेकिल्ला असून, नगरपरिषदेवर मागील ३९ वर्षातील मागील ४ वर्ष प्रशासकीय राजवट सोडता, ३५ वर्ष शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे. यावेळी शेकापने आपला नगरपालिकेतील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेससोबत आघाडी केली आहे. आघाडीसमोर भाजप, शिवसेना (शिंदे गट) युतीने आव्हान उभे केले आहे. शेकाप काँग्रेस आघाडीकडून शेकापच्या अक्षया नाईक या निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत असून, त्यांच्यासमोर भाजपच्या तनुजा पेरेकर यांचे आव्हान आहे. नगराध्यक्ष पदासाठी अक्षया नाईक व तनुजा पेटकर यांच्यात थेट लढत असून, प्रचारात अक्षया नाईक यांना मतदारांचा मिळणारा पाठिंबा पाहता त्यांचे पारडे जड मानले जात आहे.

अलिबाग नगरपरिषदेसाठी २ डिसेंबर रोजी मतदानप्रक्रिया राबविण्यात येईल तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडेल. नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अक्षया नाईक व तनुजा पेटकर यांच्यात थेट लढत आहे. तर नगरसेवक पदाच्या २० जागांपैकी एका जागेवर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित १९ जागांसाठी ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत आहेत. नगरपरिषदेत १६ हजार ३५४ मतदार असून, यामध्ये ८ हजार १४७ पुरुष मतदार तर ८ हजार २०७ महिला मतदार आहेत.

 प्रचाराची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत असून, शेवटच्या टप्प्यात उमेदवार तसेच कार्यकर्त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. मोठ्या सभा घेऊन प्रचार करण्याचे टाळून, आघाडी व युतीचे उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन तसेच प्रभागात रॅली काढून प्रचार करण्याकडे जात देत आहेत. आघाडी तसेच युतीच्या उमेदवारांनी आपण निवडून आल्यानंतर कोणती विकासकाने करणार याचे वचननामे जाहीर करीत, मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रचारात शेकाप काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अक्षया नाईक यांनी बाजी मारल्याचे चित्र दिसून येत आहे.


शेकापच्या नाईक कुटुंबाचे वर्चस्व

अलिबाग नगरपरिषदेवर माजी नगराध्यक्ष तथा शेकाप नेते प्रशांत नाईक कुटुंबियांचे वर्चस्व राहिले आहे. यापूर्वी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद स्वतः प्रशांत नाईक यांच्यासह आई सुनीता नाईक, पत्नी नमिता नाईक यांनी भूषविले आहे. तर सध्या सुरू असलेल्या नगरपरिषद निवडणुकीत शेकाप काँग्रेस आघाडीकडून प्रशांत नाईक यांची मुलगी अक्षया नाईक निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत आहे.


भाजपची मदार आयात उमेदवारावर

शेकाप काँग्रेस आघाडी उमेदवार अक्षया नाईक यांच्यासमोर भाजप शिवसेना (शिंदे गट) युतीतर्फे भाजपकडून माजी नगरसेविका तनुजा पेरेकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तनुजा पेरेकर या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात कार्यरत होत्या. निवडणूक रणधुमाळी जाहीर झाल्यानंतर भाजपने तनुजा पेरेकर यांना आपल्या पक्षात सामील करून घेत, थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. यामुळे भाजपची मदार आयात उमेदवारावर असल्याचेच दिसून येते.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx