Saturday, December 27, 2025
अलिबाग नगरपरिषदेत सत्ता मिळाल्यास भाजपची निवासी घरपट्टी माफीची घोषणा
अलिबाग नगरपरिषदेत सत्ता मिळाल्यास भाजपची निवासी घरपट्टी माफीची घोषणा ...

अलिबाग : अलिबाग नगरपरिषद निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, भाजप, शिवसेना (शिंदे गट) युती तसेच शेकाप, काँग्रेस, मनसे आघाडीकडून आपण सत्तेत आल्यानंतर आपण कोणती विकासकाने करणार असल्याचे जाहीर करीत मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा निवडणूक प्रमुख सतीश धारप यांनी शनिवारी (दि.२९) अलिबागमधील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत नगरपरिषदेत युतीची सत्ता आल्यास पुढील पाच वर्ष निवासी घरपट्टी माफ तसेच अलिबाग नगरपरिषदेची हद्दवाढ करून नगरपरिषदेचे उत्पन्न वाढविणार असल्याची घोषण केली. तसेच येथील सत्ताधारी नगरपरीषदेत पाहिजे त्या प्रमाणात विकास करण्यात अपयशी ठरल्याची टीकाही, सतीश धारप यांनी शेकाप नेत्यांवर केली आहे.

अलिबाग शहरातील नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. शहरातील भुयारी गटार योजन फाडली आहे. शहरातील कचरा व्यवस्थापन करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. क्रीडासंकुलाचे काम रखडले आहे, अशी एक ना अनेक समस्या शहरात असल्याची माहिती सतीश धारप यांनी दिली. तसेच अलिबागच्या नागरिकांच्या मनातील बदलाचा परिवर्तीत भाव ओळखून विकासाभिमूख पर्याय द्यावा म्हणून भाजप ही निवडणूक लढवत असल्याचे धारप यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती आस्वाद पाटील, जिल्हा महामंत्री  ऍड महेश मोहिते, महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा पाटील नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांच्यासह नगरपरिषदेतील भाजपचे सर्व उमेदवार, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.


अलिबाग नगरपरिषदेची हद्दवाढ करणार

अलिबाग नगरपरिषदेच्या हद्दवाढीचा प्रश्न मागील काही वर्ष प्रलंबित आहे. वाढत्या शहरीकरण आणि वाढत्या लोकसंख्येला सुनियोजित नागरी सुविधा पुरवण्यासाठी अलिबाग नगरपालिकेची हद्दवाढ होणे गरजेचे आहे. अलिबाग नगरपालिकेच्या हद्दवाढीमुळे उपलब्ध होणाऱ्या जागांमुळे कचरा व्यवस्थापन करणे शक्य आहे. शिवाय नगरपालिकेला अ वर्ग दर्जा मिळून कोट्यवधिंचा निधी उपलब्ध होईल. नगरपालिकेचे उत्पन्न वाढेल त्यामुळे भाजप सेना महायुतीच्या नगराध्यक्षा आणि नगरसेवक यांना पहिल्याच महासभेत घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेता येईल, अशी घोषणा यावेळी सतीश धारप यांनी केली.


सांबरकुंड धरणाचे काम पूर्ण होणार

राज्य सरकारने सांबरकुंड धरणाचे पैसे वर्ग करूनही साम्यवादी विचारसरणीमुळे पुनर्वसनाच्या कामात अडथळा निर्माण करण्यात आला आहे. ही अडथळ्यांची शर्यत पार करून अलिबागचा पाणीप्रश्न पुढील काळात सोडविण्यात येणार आहे. सांबरकुंड धरण पूर्ण झाल्यास केवळ अलिबाग शहरच नाही तर अर्धा रोहा आणि अर्धा मुरुड तालुका यांचीही पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे, अशी माहिती सतीश धारप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx