Saturday, December 27, 2025
अलिबागचा डंपिंग ग्राउंडचा प्रश्न ऐरणीवर
अलिबागचा डंपिंग ग्राउंडचा प्रश्न ऐरणीवर...

अलिबाग : नगरपरिषद निवडणुक रणधुमाळीमुळे अलिबागचे वातावरण तापले असतानाच नगरपरिषदेच्या डंपिंग ग्राउंडचा प्रश्नाने डोके वर काढले आहे. डंपिंग ग्राउंडच्या प्रश्नावरून वन विभाग व अलिबाग नगरपरिषद प्रशासनात वाद सुरू झाला आहे. डंपिंग ग्राउंडची जागा कांदळवनात येत असल्याचा दावा करीत, वन विभागाने संबंधित जागेत कचरा टाकण्यासाठी नगरपरिषदेला बंदी केली आहे. यामुळे अलिबाग शहरासह आजुबाजूच्या ग्रामपंचायतींमध्ये कचरा प्रश्न उभा ठाकणार आहे.

अलिबाग रेवदंडा मार्गालगत गोविंद बंदर परिसरात नगरपरिषदेचे डंपिंग ग्राउंड आहे. येथे मागील अनेक वर्षांपासून नगरपरिषदाश तसेच शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायती आपल्या हद्दीत जमा होणारा कचरा टाकतात. येथे नगरपरिषदेच्या माध्यमातून दिवसाला सुमारे १२ टन कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. 

सोमवारपासून वन विभागाने अचानकपणे या जागेत कचरा टाकण्यास नगरपरीषद तसेच ग्रामपंचायतींना बंदी केली आहे. कचरा टाकण्यात येत असलेल्या जागेचा काही भाग वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या जागेत येत असून, येथे कांदळवन क्षेत्र असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जागेची पाहणी करीत हद्द निश्चित करण्याचे काम केले आहे. कांदळवन विभागीय वन अधिकारी यांनी ही कारवाई सुरू केली आहे. वनविभागाच्या या कारवाईमुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न नगरपरिषदेसह परिसरातील ग्रामपंचायतीना पडला आहे.


शहरात ठिकठिकाणी कचरा पडून

अलिबाग शहरातील कचरा भूमीचा काही भाग कांदळवन विभागाच्या जागेमध्ये येत असल्याचा दावा कांदळवन विभागाने केला. त्यामुळे सोमवारपासून या भूमीत कचरा टाकण्यास वन विभागाने मनाई केली. त्याचा परिणाम शहरात ठिकठिकाणी कचरा पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे.

निवडणूक प्रचारात कचरा प्रश्न गाजणार

अलिबाग नगरपरिषदेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच कचरा प्रश्नाने डोके वर काढले असून, कचऱ्याचा प्रश्न प्रचारात गाजणार आहे. विरोधकांकडून डंपिंग ग्राउंडच्या प्रश्नावरून मागील सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यात येणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.


शहरातील कचरा ज्या भूमीत टाकला जातो, तेथील काही भाग कांदळवनामध्ये येतो. त्यामुळे कचरा टाकू नये, अशी सुचना नगरपालिकेला दिल्या असून हद्द कायम करण्याची कार्यवाही सुरु केली आहे.

: कुलदीप पाटकर, 

वन परिक्षेत्र अधिकारी, कांदळवन विभाग, अलिबाग


शहरातील कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो. त्यातील काही जागा कादंळवन विभागाची येत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, त्यावर योग्य मार्ग काढून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम केले जाईल.

: सागर साळुंखे, 

मुख्याधिकारी, अलिबाग नगरपरिषद

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx