अलिबाग : अलिबाग शहरातील बसस्टँड परिसरात हार, फुले, गजरे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांच्या मुलांसाठी सिग्नल स्कूल, अलिबागच्या स्वयंसेवकांनी सुरू केलेल्या ‘वस्ती वर्ग’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर २९२४ पासून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे शिक्षणापासून दूर जाणाऱ्या ३ ते १२ वयोगटातील मुलांना नव्याने अभ्यासाची गोडी लागण्यास मदत होत आहे. वस्तीतील अंदाजे ५० ते ५५ मुलांपैकी दररोज १० ते १५ मुले नियमितपणे या वर्गांना उपस्थित राहतात. विविध शैक्षणिक उपक्रम, खेळ, शिकवणी पद्धतींमुळे मुलांना आणि पालकांना हा उपक्रम आवडू लागला आहे.
स्मशानभूमीसमोरील वस्तीत राहणाऱ्या या कुटुंबांशी संवाद साधताना स्वयंसेवकांना लक्षात आले की पालकांमध्ये मुलांना शाळेत पाठविण्याची इच्छा असली, तरी त्यांच्या कामाच्या वेळा आणि परिस्थितीमुळे मुलांची शाळेत नियमित उपस्थिती होत नाही. काही मुले शाळेत जात असली तरी अनेकांची उपस्थिती अनियमित असून, काहीजण मध्येच शाळा सोडत असल्याचेही दिसून आले.
या समस्येचा उपाय म्हणून स्वयंसेवकांनी मुलांच्या राहत्या वस्तीतच संध्याकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत ‘वस्ती वर्ग’ सुरू केला. मुलांनी अभ्यासाची ओळख निर्माण करून घेणे, त्यांच्यात आरोग्यपूर्ण सवयी विकसित करणे आणि पुढे त्यांना जवळच्या शासकीय शाळेत नियमितपणे प्रवेश व उपस्थिती ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. वस्तीतील अंदाजे ५० ते ५५ मुलांपैकी दररोज १० ते १५ मुले नियमितपणे या वर्गांना उपस्थित राहतात. विविध शैक्षणिक उपक्रम, खेळ, शिकवणी पद्धतींमुळे मुलांना आणि पालकांना हा उपक्रम आवडू लागला आहे.
स्वयंसेवकांची आवश्यकता
या वस्ती वर्गाला सातत्याने चालू ठेवण्यासाठी संवेदनशील, मुलांशी आपुलकीने संवाद साधू शकणारे, उत्तम वाचणारे–लिहिणारे १८ ते ५० वयोगटातील स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. इच्छुक स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षणाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
साहित्याच्या स्पॉन्सरशिपचे स्वागत
वस्ती वर्गासाठी लागणारे वह्या, पुस्तके, शालेय साहित्य तसेच इतर शैक्षणिक साधने वस्तूरूपात देणगी म्हणून स्वीकारली जाणार आहेत. समाजातील वंचित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाला सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे सिग्नल स्कूल प्रकल्प स्वयंसेवक टीमने सांगितले.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx