Saturday, December 27, 2025
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा ...

अलिबाग : रायगड जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी मुसळधार पावसाने हातातोंडाशी आलेले भात, नागली, वरीचे पिकाचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १७ हजार ८२ हेक्टर क्षेत्रावर नुकसान केले आहे. या नुकसानीत ४२ हजार ९८० शेतकरी बाधित झाले आहेत. कृषी विभागाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे १४ कोटी ६८ लाख ८३ हजार रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मात्र शासनाकडून निधी प्राप्त झाला नसल्याने शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत. विशेष म्हणजे चालू वर्षात पावसाळ्यात जून ते सप्टेंबर दरम्यान जेवढे पिकावर नुकसान झाले नाही तेवढे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. 

रायगड जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर भातशेती तर ३ हजार हेक्टर क्षेत्रावर कडधान्य पीक घेतले होते. ९० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड घेण्यात आली होती. यंदा मे महिन्यात पावसाचे आगमन झाले. यामुळे भात लागवडीचे चक्र बदलले. जून महिन्यात भात लागवड शेतकऱ्यांनी केली. जून महिन्यात ही पावसाचा जोर होता. त्यांनतर जुलै महिन्यात पाऊस येजा सुरू होती. ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला होता. सप्टेंबर महिन्यात पूर्वार्धात पाऊस कमी पडला. मात्र शेवटच्या आठवड्यात पावसाने मुसळधार सुरुवात केली. रायगड जिल्ह्यातील शेती चांगली बहरली होती. त्यामुळे यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यता होती. मात्र ऑक्टोंबर महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पाडली आहे.

रायगड जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर अशा सहा महिन्यात मुसळधार आणि अवकाळी पावसाने ७ हजार २६६.१८ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले होते. मात्र ऑक्टोंबर महिन्यात अवकाळी पावसाने सर्वाधिक १७ हजार ८२ हेक्टर लागवड क्षेत्र बाधित करून गेले आहे. त्यामुळे भात पीक भिजून वाया गेले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. कृषी विभागातर्फे नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे पूर्ण केले आहेत.

कृषी विभागातर्फे झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. यामध्ये १ हजार ७४३ गावातील ४२ हजार ९८० शेतकऱ्यांचे १७ हजार ८२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कृषी विभागाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे १४ कोटी ६८ लाख ८३ हजार रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे. शासनाकडून अद्याप नुकसान भरपाईचे पैसे आलेले नाही आहेत. नुकसान भरपाईकडे शेतकऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे. 


.अवकाळीने ऑक्टोंबर महिन्यात झालेले नुकसान

तालुका : बाधित गावे : शेतकरी : बाधित क्षेत्र हेक्टर

अलिबाग : २१० : ६ हजार ७९५ : ३ हजार ४४.४०                 

पेण : १४८ : ७ हजार ९८ : २ हजार ५००                 

मुरुड : ६६ : २ हजार ८५४ : १ हजार ४३९.७०

खालापूर : ९५ : ९९३ : ३२०.१     

कर्जत : २०७ : २ हजार ६६१ : १ हजार ४९.८१

पनवेल : १३५ : १ हजार ५१७ : ६०२   

उरण : २६ : ३०५ : १११.७७

माणगाव : १४२ : ३ हजार ८९७ : १ हजार ३३२.८४

तळा : ४७ : ४६४ : १२२.८९   

रोहा : १६८ : ५ हजार १२५ : २ हजार ८९५.२५    

सुधागड : १०१ : १ हजार ९४४ : ७९१.५९

महाड : १८५ : ५ हजार ८०३ : १ हजार ६५४.६९  

पोलादपूर : ८६ : १ हजार ५१७ : ४२४.७०

म्हसळा : ४२ : १ हजार २०० : ४७०.३१

श्रीवर्धन : ६५ : ८९७ : ३२२.९५


यंदा चार महिने पावसाळा हंगामात जेवढे शेतीचे नुकसान झाले नाही. त्यापेक्षा अधिक नुकसान ऑक्टोंबर महिन्यात अवकाळी पावसाने केले आहे. जिल्ह्यातील १७ हजार हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसाने बाधित केले आहे. नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर केला आहे. १४ कोटीची मागणी केली असून लवकरच निधी शासनाकडून प्राप्त होईल.

: वंदना शिंदे, 

जिल्हा कृषी अधिकारी, रायगड

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx