Saturday, December 27, 2025
केंद्रीय सहकार मंत्रालयाचे संचालक पंकज श्रीवास्तव यांची आरडीसीसी बँकेला भेट
केंद्रीय सहकार मंत्रालयाचे संचालक पंकज श्रीवास्तव यांची आरडीसीसी बँकेला भेट...

अलिबाग : केंद्रीय सहकार मंत्रालयाचे संचालक पंकज श्रीवास्तव यांनी केंद्र सरकारच्या अभिनव उपक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या देशातील बँकांमधील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गुरुवारी (दि.१२) भेट दिली आणि बँकेच्या प्रगतीचा आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेत बँकेचे कौतुक केले. विशेष म्हणजे २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताकदिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बँकेचा गौरव करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी आवर्जून सांगितले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासातील महाराष्ट्राला रायगड बँकेच्या रूपाने मिळणारा हा मान देशातील पहिली ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण घटना ठरणार आहे. 

यावेळी दरम्यान नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप आपसुंदे, पुणे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, रायगड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रमोद जगताप, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, विभागीय अधिकारी संदेश पाटील, कर्ज वसुली प्रमुख डी.एम.जाधव, खालापूर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन निलेश घोसाळकर, तसेच विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नाबार्ड आणि केंद्र शासनाच्या विविध पायलट योजना यशस्वीपणे राबवून देशातील अग्रेसर बँक ठरली आहे, तसेच जिल्हा सहकारी बँक, जिल्हा उपनिबंधक आणि नाबार्ड हे सुसंगतपणे, एकत्रित आणि तितकेच प्रभावीपणे काम करत असल्याने असा अनुभव देखील दुर्मिळ असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले. बँकेने शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम बनविण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे, असे त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले. तसेच बँकेला आवश्यक त्या तांत्रिक आणि आर्थिक सहाय्याचे आश्वासन त्यांनी केंद्र शासनाच्या वतीने दिले. या भेटीच्या निमित्ताने खालापूर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन निलेश घोसाळकर यांनी देखील उपस्थित उच्चपदस्थ अधिकार्‍यांसोबत संवाद साधला तर नाबार्डचे प्रदीप आपसुंदे यांनी नाबार्डच्या प्रकल्पांबाबत माहिती दिली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी उपस्थितांचे स्वागत करीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

यावेळी संस्था संगणकीकरणामध्ये बँकेचे अधिकारी योगेश पाटील आणि नेहा पाटील यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पंकज श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले की, केंद्र शासनाचे उद्दिष्ट सहकारी संस्था सक्षम बनविणे हे असून, ग्रामीण भागात स्वयंरोजगार, उद्योगविकास आणि वित्तीय साक्षरता वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम सुरू आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि स्थानिक सहकारी संस्था यांनी मिळून या उपक्रमांना गती दिल्यामुळे  रायगड जिल्हा महाराष्ट्रातील एक आदर्श सहकार मॉडेल बनू शकला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीवास्तव यांनी सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि सभासदांचे सहकार्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे विभागीय अधिकारी संदेश पाटील यांनी केले. 

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx