अलिबाग : अलिबाग तालुक्यातील नागाव, आक्षी परिसरात मागील पाच दिवसांपासून एका बिबट्याचा वावर आढळून आलं आहे. या बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या यंत्रणेला अपयश आले आहे. त्यातच बिबट्याने आत्तापर्यंत ८ जणांवर हल्ला केला आहे. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. त्यातच परिसरातील गावांमध्ये सातत्याने बिबट्या आला रे.... च्या अफवा पदरात आहेत. यामुळे खऱ्या बिबट्यापेक्षा, बिबट्या आला रे या अफवेमुळे नागरिकांमध्ये जास्त दहशत निर्माण होत आहे. तसेच वनविभागालाही या अफवांचा ताप झाला असल्याचे दिसून येत आहे.
अलिबाग जवळच्या नागाव मधील वाळंज पाराेडा खालच्या आळीत भर वस्तीत मंगळवारी (दि.९) सकाळी बिबट्याचा वावर आढळून आला. दिवसभरात बिबट्याने सहा जणांवर हल्ला केला. बिबट्याला पकडण्यासाठी अलिबाग वनविभागाचे कर्मचारी यांच्यासह राेहा येथील व पुणे वनविभागाच्या रेस्क्यू टिम दाखल झाल्या. मात्र बिबट्याला पकडण्यात यंत्रणेला अपयश आले. यांनतर बुधवार व गुरुवारी बिबट्या कुणाच्याही दृष्टीस पडला नाही. यामुळे रेस्क्यू टीम परत गेल्या. मात्र शुक्रवारी (दि.१२) नागाव लगत असलेल्या आक्षी गावातील साखर परिसरात बिबट्या आल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी पहाटे बिबट्याने साखर परिसरात दोन जणांवर हल्ला करीत त्यांना जखमी केले. यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी अलिबाग वनविभाग व रोहा वनविभागाच्या रेस्क्यू टीमने आक्षी साखर येथे बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचित चार पिंजरे लावले. या पिंजऱ्यांमध्ये कोंबड्या सोडण्यात आल्या. मात्र बिबट्या पिंजऱ्यात न गेल्याने बिबट्याला पकडण्याच्या वनविभागाच्या प्रयत्नांवर पाणी फेडले गेले.
नागाव व आक्षी साखर येथे बिबट्या दिसल्याने परिसरातील गावांमध्ये बिबट्या दिसल्याच्या अफवा पसरविणाऱ्या पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल होतायत. चुकीचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले जातायत. शुक्रवारी रात्री सुरुवातीला कुरुळ येथील आरसीएफ कॉलनी येथे बिबट्या दिसल्याची आवई उठली होती. यांनतर थोड्या वेळाने अलिबाग शहरातील डंपिंग ग्राउंड येथे बिबट्या दिसल्याचे व त्याने एका कुत्र्याला पकडला असल्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला. या परिसरात वनविभागाने पाहणी केली. यावेळी येथे बिबट्याचे कोणतेही अस्तित्व दिसून आले नाही. यांनतर सदर व्हिडिओ हा अलिबागचा नसल्याचे लक्षात आले. तसेच परिसरातील इतर गावांमध्येही बिबट्या पाहिल्याचा अफवा सातत्याने पसरत असल्याचे दिसून येते. यामुळे बिबट्या पेक्षा बिबट्या आला रे...च्या अफवांमुळे नागरिकांमध्ये जास्त दहशत निर्माण होत आहे. या अफवांमुळे वन विभागाची डोकेदुखी वाढलीय. मागील चार दिवसांत कुठं ना कुठं बिबट्या दिसल्याची अफवा पसरते. वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी जाऊन शोध घेतात. मात्र हाती काहीच लागत नसल्याचे चित्र दिसून येते.
आक्षी साखर येथे बिबट्या शोध मोहिमेदरम्यान अत्यंत सावधगिरी बाळगली जात आहे. ज्या परिसरात बिबट्या दिसून आला आहे, तेथून बघ्यांची गर्दी हटवण्यात आली आहे. पोलीस, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, बचाव पथक आणि मोजकेच ग्रामस्थ यांनाच परिसरात प्रवेश दिला जात आहे. ध्वनिवर्धकावरून सावधगिरीच्या सूचना दिल्या जात आहेत. नागाव, आक्षी परिसरातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच कुणीही एखाद्या ठिकाणी बिबट्या दिसला अशी माहिती आल्यास त्या माहितीची शहानिशा केल्याशिवाय पुढे फॉरवर्ड करू नये, असे आवाहन वनविभाग तसेच पोलीस विभागाने केले आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx