Saturday, December 27, 2025
खून प्रकरणातील फरार आरोपीला २४ वर्षांनंतर पकडण्यात रायगड पोलिसांना यश
खून प्रकरणातील फरार आरोपीला २४ वर्षांनंतर पकडण्यात रायगड पोलिसांना यश...

देश महाराष्ट्र

अलिबाग :गर्भवती असणाऱ्या भावजयीचा खून करून मागील २४ वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात रायगड पोलिसांना यश मिळाले आहे. संतोष राणे असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेतले आहे. 

कर्जत तालुक्यातील कळंब गावातील पोही गावातील आरोपी संतोष राणे हा कोणताही कामधंदा करीत नव्हता. यावरून त्याचे भावाच्या बायकोसोबत वाद होत होते. २ फेब्रुवारी २००१ रोजी दुपारी तीनच्या सुमारास संतोष राणे व भावजय यांच्यात वाद झाला. सदर बाब आरोपीचा भाऊ व आई यांच्या लक्षात आली. त्यांनी आरोपी यांची समजूत काढून घरात पाठवले. या गोष्टीचा राग आल्याने आरोपी संतोष याने घरातून कुऱ्हाड आणून भावजयीच्या मानेवर, दंडावर आणि हातवर वार केले. या हल्ल्यात गर्भवती असलेल्या भावजयीचा मृत्यू झाला.‌ याप्रकरणी मयत हिच्या पतीने नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले होते व मागील २४ वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत होता.

पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी तपासावर प्रलंबित या गंभीर गुन्ह्याचा तपास करून आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश नेरळ पोलीसांना दिले होते. यानंतर पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी या गुन्ह्याचा पुन्हा तपास सुरू केला. नेरळ पोलीसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी एका विशेष पथकांची नियुक्ती केली. पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे, पोलीस शिपाई राजाभाऊ केकाण आणि पोलीस शिपाई आश्रुबा बेंद्रे यांचा समावेश होता. सुरुवातीला पोलीसांनी फिर्यादी आणि त्यांच्या नातलगांकडे जाऊन आरोपींच्या सध्याच्या वास्तव्याबाबत विचारणा केली. मात्र कोणीही माहिती दिली नाही. त्यामुळे तांत्रिक तपास करून पोलीसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा तो पिंपरी चिंचवड येथे एका कँटरर्सकडे काम करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी संतोष राणे याला पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेतले. याप्रकरणचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक करत आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx