Wednesday, February 25, 2026
ताम्हिणी घाटात बस अपघातात २७ जण जखमी
ताम्हिणी घाटात बस अपघातात २७ जण जखमी...

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील माणगाव इथं ताम्हिणी घाटात एका खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. एका तीव्र वळणावर हा अपघात झाला. यावेळी खासगी बसने एका कारला देखील उडवलं आहे. यामुळे ही कार रस्ता ओलांडून झाडीत अडकून बसली. या अपघातात २७ प्रवासी जखमी झाले असून यातील आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त बस आज सकाळी साडे अकराच्या सुमारास पुण्यातील भोसरी परिसरातून निघाली होती. बसमध्ये भोसरी येथील सावन IB Auto प्रा. लिमिटेड कंपनीचे ५० कर्मचारी होते. हे सर्वजण काशिद बीचला फिरायला जात होती. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ही खाजगी बस ताम्हीणी घाटात आली असता एका तीव्र वळणावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. बस रस्त्यावरून खाली उतरली आणि बाजुच्या खडकाळ भागाला जाऊन धडकली. यावेळी या बसने एका कारला देखील उडवलं. ही अपघात ग्रस्त कारही रस्ता ओलांडून एका झाडीत जाऊन अडकली. या अपघातात २७ प्रवासी जखमी झाले असून ८ ते १० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस प्रशासन आणि स्थानिक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना उपचारसाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx