अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दहा नगरपरिषदेतील १०७ प्रभागातून ३०८ मतदान केंद्रातून २ लाख ३७ हजार ५०३ मतदार १० नगराध्यक्ष आणि २०७ सदस्य निवडून देणार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. खोपोली नगरपरिषदेमध्ये सर्वाधिक ६२ हजार ७४ तर सर्वात कमी माथेरान नगरपरिषद मध्ये ४ स्थिर ५५ मतदार आहेत.
जिल्ह्यातील दहा नगरपरिषदेच्या निवडणुकीबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके यावेळी उपस्थित होते. अलिबाग, मुरुड, पेण, रोहा, श्रीवर्धन, महाड, कर्जत, खोपोली, माथेरान आणि उरण या दहा नगरपरिषदेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने व्होटिंग मशीन उपलब्ध झाल्या असून काही मशिन मध्य प्रदेश मधून येणार आहेत. निवडणुकीला लागणारे अधिकारी, कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आलेला आहे. दीड हजार मतदान कर्मचारी लागणार आहेत. निवडणूक काळात आचारसंहिता लागू झाली असून राजकीय पक्षांनी त्याचे तंतोतंत पालन करावे. आचारसंहिता भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
निवडणूक खर्चाबाबत खोपोली नगरपरिषद ही ब वर्गात मोडत असल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी ११ लक्ष २५ हजार तर सदस्यसाठी साडेतीन लाख खर्च मर्यादा आहे. उर्वरित नगरपरिषदा ह्या क वर्गात मोडत असल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी ७ लाख ५० हजार तर सदस्य पदासाठी २ लाख ५० हजार खर्च मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
नगरपरिषद : प्रभाग : सदस्य : मतदार : मतदान केंद्र
खोपोली : १५ : ३१ : ६२ हजार ७४ : ७७
अलिबाग : १० : २० : १६ हजार ३५४ : २२
श्रीवर्धन : १० : २० : १२ हजार ६३७ : २०
मुरुड : १० : २० : ११ हजार ५४४ : २०
रोहा : १० : २० : १७ हजार ६६९ : २०
महाड : १० : २० : २३ हजार १२४ : ३०
पेण : १२ : २४ : ३३ हजार ८७५ : ४२
उरण : १० : २१ : २६ हजार २१४ : ३०
कर्जत : १० : २१ : २९ हजार ९५७ : ३७
माथेरान : १० : २० : ४ हजार ५५ : १०
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx