अलिबाग : प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.१२) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलक आक्रमक झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या दारात ठाण मांडून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र अचानक झालेल्या या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गोंधळ उडाला होता.
आपल्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने रायगडमधील दिव्यांग बांधवांनी आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून व्हरांडयातच ठिय्या मांडला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के मोर्चाला सामोरे गेले.
आमदार, खासदार यांचा विकास निधी दिव्यांगांसाठी खर्च केला जात नाही. तो पूर्वलक्षी प्रभावाने खर्च करावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी होती. दिव्यांगाना अडीच हजार रुपयांची पेन्शन देण्याचा नि र्णय शासनाने घेतला आहे परंतु त्यांची अंमलबजावणी का केली जात नाही असा सवाल आंदोलक दिव्यांगानी उपस्थित केला. आजच्या मोर्चात दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलनाला सुरुवात केली. मात्र अचानक आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयात शिरले आणि इमारतीच्या दारातच ठाण मांडून रस्ता अडवून धरला.
निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी त्यांची भेट घेतली जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपंग कल्याण निधी राखून ठेवण्याबाबतचे पत्र दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. संदेश शिर्के यांच्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही. रायगड जिल्हा परीषदेच्या अपंग कल्याण विभागात झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करा अशीही मागणी आंदोलकांनी केली. बराच वेळ आंदोलक कार्यालयाच्या दारात बसून घोषणाबाजी करत होते.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx