अलिबाग : रायगड जिल्ह्यात १० नगरपरिषदांमध्ये निवडणूक.प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. ज्या नगरपरिषद क्षेत्रात निवडणूका होत आहेत तेथील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी १ डिसेंबर ते ३ डिसेंबर या तीन दिवशी सर्व देशी, विदेशी किरकोळ मद्य व माडी विक्री विक्री दुकानांमध्ये मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, मुरूड-जंजिरा, पेण, उरण, कर्जत, माथेरान, रोहा, श्रीवर्धन व महाड या नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान व ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे या नगरपरिषदेच्या हद्दीत मध्य विक्री बंदी आदेश लागू होणार आहे.
मध्य विक्री बंदी आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित परवाना धारकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx