Saturday, December 27, 2025
नगरपरिषद निवडणूक रायगडकरांचा संमिश्र कौल
नगरपरिषद निवडणूक रायगडकरांचा संमिश्र कौल...

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १० नगरपरिषदांची मतमोजणी रविवारी (दि.२१) पार पडली. जिल्ह्यात संमिश्र निकाल लागला. ३ नगरपरिषदांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले. तर शिवसेना (शिंदे गट) ३, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भाजप १, शेकाप १, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) १ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, पेण, रोहा, श्रीवर्धन, महाड, कर्जत, खोपोली, माथेरान आणि उरण या दहा नगरपरिषदांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती. जिल्ह्यातील १० नगरपरिषदांमध्ये नागरध्युध पदासाठी ३४ तर २०७ नगरसेवक पदांसाठी ५७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत होते. 

निवडणुकीसाठी मतमोजणी रविवारी करण्यात आली. मतमोजणी दरम्यान मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मतमोजणीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते जल्लोष करीत होते. तर पराभूत उमेदवारांचे कार्यकर्ते मन खाली घालून मतदान केंद्र परिसरातून काढता पाय घेत होते.

जिल्ह्यातील १० पैकी मुरुड, रोहा, कर्जत नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) उमेदवार विजयी झाले आहेत. तर खोपोली, महाड, माथेरान नगरपरिषदेत शिवसेना (शिंदे गट), श्रीवर्धन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), अलिबाग शेतकरी कामगार पक्ष, उरण राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), पेण भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.


दिग्गजांना धक्का

नगरपरिषद निवडणुकीत दिग्गजांना मतदारांनी जोरदार धक्का दिला आहे. अलिबागचे शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांच्या मतदारसंघात येणाऱ्या अलिबाग नगरपरिषदेत शेकापने भाजप शिवसेना युतीचा धुव्वा उडवला. शेकापचा आक्षया नाईक या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. अलिबाग मतदारसंघात शिंदे गटाला खातेही उघडता आले नाही. तर त्यांच्या मतदारसंघातील दुसऱ्या मुरुड नगरपरिषदेवर राष्ट्रवादी (अजित पवार गट) झेंडा फडकला. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातील श्रीवर्धन नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार ॲड. अतुल चौगले यांनी राष्ट्रवादी उमेदवाराचा पराभव करीत आदिती तटकरे यांना जोरदार धक्का दिला. तर भाजपचे उरण मतदारंघाचे  आमदार महेश बालदी यांना उरण नगरपरिषदेत सत्ता राखण्यात अपयश आले. उरण मतदारसंघात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार भवनाताई घाणेकर यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाजी मारली.


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिलेदारांनी केली कमाल 

नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी धकधकती मशाल पेटवली. श्रीवर्धन नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार ॲड. अतुल चौगले यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे जितेंद्र सातनाक यांचा पराभव करीत श्रीवर्धन नगरपरिषदेवर भगवा फडकवला. तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीत अलिबाग २, मुरुड ४, उरण ७, पेण ३, माथेरान १, कर्जत ४ असे २१ उमेदवार विजयी झाले आहेत.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx