अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १० नगरपरिषदांची मतमोजणी रविवारी (दि.२१) पार पडली. नगरपरिषद निकालाच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) रायगडकरांनी पहिली पसंती दिल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) खालोखाल रायगडकरांनी शिवसेना (शिंदे गट) व भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर पाचव्या क्रमंकावर शेतकरी कामगार पक्ष राहिला आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, पेण, रोहा, श्रीवर्धन, महाड, कर्जत, खोपोली, माथेरान आणि उरण या दहा नगरपरिषदांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती. जिल्ह्यातील १० नगरपरिषदांमध्ये नागरध्युध पदासाठी ३४ तर २०७ नगरसेवक पदांसाठी ५७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत होते. निवडणुकीसाठी मतमोजणी रविवारी करण्यात आली.
जिल्ह्यातील १० पैकी मुरुड, रोहा, कर्जत नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) उमेदवार विजयी झाले आहेत. तर खोपोली, महाड, माथेरान नगरपरिषदेत शिवसेना (शिंदे गट), श्रीवर्धन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), अलिबाग शेतकरी कामगार पक्ष, उरण राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), पेण भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना (शिंदे गट) यांचे नगराध्यक्ष पदाचे प्रत्येकी ३ उमेदवार निवडून आले असले तरी, २०७ नगरसेवक पदांच्या जागांसाठी सर्वाधिक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ७० तर शिवसेना (शिंदे गट) ५१ उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्या खालोखाल भाजपचे ३५, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २१, शेतकरी कामगार पक्ष २०, काँग्रेस ३, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार २ उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. तसेच अपक्ष व इतर आघाड्यांचे ५ उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
पक्ष : नगराध्यक्ष : नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : ३ : ७०
शिवसेना (शिंदे गट) : ३ : ५१
भाजप : १ : ३५
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : १ : २१
शेतकरी कामगार पक्ष : १ : २०
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार : १ : २
कॉंग्रेस : ० : ३
अपक्ष व इतर आघाड्या : ० : ५
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx