नागोठणे : नागोठण्यातील जैन मंदिरातील पुजाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नागोठणे बाजार पेठेतील जैन मंदिरासमोरच असलेल्या आराधना भवन या इमारतीत बेड शीटच्या साईड पट्टीच्या सहाय्याने सीलिंग फॅनला गळफास घेऊन मयुरकुमार महेशभाई राठवा या पुजाऱ्याने आपली जीवन यात्रा संपविली आहे.
जैन मंदिरातील मुख्य पुजारी काही दिवसांपूर्वी गावी गेल्याने सध्या त्याच्या जागी बदली पुजारी म्हणून साधारण पंधरा दिवसांपूर्वी हा पुजारी जैन मंदिरात नित्य पूजाविधी करण्यासाठी आलेला होता. गुजरात राज्यातील मूळ रहिवासी असलेला हा पुजारी सध्या आराधना भवन येथील तिसऱ्या माळ्यावरील एका खोलीत त्याची पत्नी पिंपकलबेन हिच्यासह राहत होता. पंख्याला लटकलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आल्याने नागोठण्यात खळबळ निर्माण झाली.
या पुजाऱ्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून याप्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस ठाण्यातील पो.हवा. महेश रुईकर अधिक तपास करीत आहेत.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx