अलिबाग : आलिशान होंडा सिटी कारमधून उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रेकी करून भर दिवसा बंद घरांचे लॉक तोडून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश आले आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार असलेल्या शाहनवाज कुरेशी यांच्यासह तिघांना उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथून रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून १५ लाख ५० हजार किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
मागील काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यात, विशेषतः पाली, रोहा, महाड, श्रीवर्धन येथे, दिवसा घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. सर्व गुन्ह्यांमध्ये एक आलिशान होंडा सिटी कारचा वापर होत असल्याचे निष्पन्न झाले होते. ही टोळी उच्चभ्रू सोसायट्यांमधील बंद घरे हेरून, त्यांचे कुलूप तोडून मौल्यवान दागिने व रोकड लंपास करत होती. हे आरोपी रायगडसह शेजारील जिल्ह्यांतही अशाच प्रकारे घरफोड्या करीत होते. तसेच ते एका जिल्ह्यात घरफोडी केल्यानंतर संबंधित जिल्ह्यात न राहता दुसऱ्या जिल्ह्यात वास्तव्य करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी हे सिकंदराबाद, उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखालील दोन पथके तात्काळ सिकंदराबादला रवाना झाली. या पथकांनी सलग एक महिना आरोपींच्या परिसरात वेष पालटून रेकी केली आणि सविस्तर माहिती काढली.
मुख्य आरोपी शाहनवाज घरी आल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. रायगड पोलीस पथकांनी स्थानिक पोलिसांची मदत घेत आरोपीच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत शाहनवाज इकराम कुरेशी (वय ५०) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने इतर साथीदारांच्या मदतीने रायगड, रत्नागिरी आणि सातारा (वाई) जिल्ह्यांत घरफोड्या केल्याची कबुली दिली. यांनतर पोलिसांनी शमीम इस्लाम कुरेशी व हिना शाहनवाज कुरेशी यांना ताब्यात घेतले असून, नौशाद इकराम कुरेशी व एहसान हे दोन आरोपी फरार आहेत. अटक आरोपींकडून १५ लाख ५० हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
सदर कारवाई कारवाई पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे आणि कारवाई पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx