अलिबाग : अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या झालेल्या भात पिकाच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या शेतकरी सभेतर्फे करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून वादळी वारेबतडेच अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. यामुळे रायगड जिल्ह्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तयार झालेले भात पिक शेतात आडवे पडून पाण्यात भिजले आहे. यामुळे भाताच्या कणसाला मोड येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या भात शेतीचे सरसकट पंचनामे करण्यात यावे, यासाठी शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठीत शासनाने शेतकऱ्यांच्या झालेल्या भात पिकाचे नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू असून, लवकरच पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाईसाठी शासनाने प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती दिली.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, अलिबाग तालुका शेतकरी सभा अध्यक्ष अनिल गोमा पाटील, ॲड. गौतम पाटील, सुरेश घरत यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx