देश महाराष्ट्र
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १० नगरपरिषदांसाठी मतदान प्रक्रिया मंगळवारी (दि.२) पार पडली. मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार मतमोजणी २१ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत वापरण्यात आलेली मतदान यंत्रे कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत तालुक्याच्या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. या स्ट्रॉंग रूम बाहेर राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. यासह स्ट्रॉंग रूमवर उमेदवारांचे प्रतिनिधी लक्ष ठेवून आहेत.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, पेण, रोहा, श्रीवर्धन, महाड, कर्जत, खोपोली, माथेरान आणि उरण या दहा नगरपरिषदांसाठी मंगळवारी (दि.२) मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणूक जाहीर करताना या नगरपरिषदांची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होईल असे राज्य निवडणूक.आयोगाने जाहीर केले होते. मात्र मंगळवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर मतमोजणी २१ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.
शेवटच्या क्षणी मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याने जिल्हा प्रशासनासमोर मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले. मतदान यंत्रे ठेवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आल्या आहेत. या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर २४ तास बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे १० कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचे १ अधिकारी आणि ३ कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच स्ट्रॉंग रूमवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.. स्ट्रॉंग रूम बाहेर उमेदवारांच्या प्रतिनिधींना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx