देश महाराष्ट्र
माणगाव : मुंबई गोवा महामार्गावर माणगाव परिसरातील कळमजे पुलाजवळ बुधवारी सकाळी शिवशाही बस व सी.एन.जी. सिलेंडर वाहतूक करणारा ट्रॅक यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. या अपघातात बसमधील प्रवासी मुंबई विक्रोळी येथील शाम गावडे यांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक रोखून धरल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. महामार्गावर दोन्ही साइडला सुमारे ६ ते ८ किलोमीटर वाहनांच्या रांगा दिसून येत होत्या. यामुळे वाहनचालक तसेच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
मुंबईहुन मालवणकडे निघालेली शिवशाही बस (एम.एच.०९ इएम ९०७४) व माणगाव बाजूकडून येणारा ट्रक (एम.एच. ४३ सीके ३४२१) या वाहनांची मुंबई गोवा महामार्गावरील कळमजे पुलाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले असून ,शिवशाही बसचा दर्शनी भागापासून मागील काही भाग कापून गेला आहे.
या अपघातात शाम गावडे यांचा उपचारादरम्यान माणगाव उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तर अंकुश चंद्रकांत मेस्त्री, शशिकांत तावडे, प्रशांत राजशिर्के, सुप्रिया मोरे, प्रतिभा नागवेकर, आर्या मयेकर, गायत्री मयेकर, अक्षता पोळवणकर, दीपाली मोकळ, आयशा मयेकर हे दहा प्रवासी जखमी झालं आहेत.
अपघातग्रस्त ट्रकमध्ये सिएनजी गॅस सिलेंडर असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद केली. यामुळे मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. दोन्ही बाजूकडे सुमारे ६ ते ८ किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ८.३० ते ९ वाजण्याच्या दरम्यान अपघातग्रस्त वाहने मार्गावरून बाहेर काढण्यात आली. यानंतर महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली. यांनतर साधारण दीड तासांनी वाहतूक पूर्ववत करण्यात पोलिस विभागाला यश मिळाले.
या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करीत आहेत.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx