अलिबाग : राज्यातील माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षे प्रलंबित आहेत. न्यायालयीन आदेशानुसार सुरु करण्यात आलेली शिक्षकेतर कर्मचार्यांची पदभरती देखील शिक्षण संचालक यांनी परिपत्रक काढून बंद केलेली आहे. माध्यमिक शिक्षकेतर कर्मचार्यांच्या न्याय मागण्यांसंदर्भात तातडीने बैठक बोलावून संघटना पदाधिकार्यांसमवेत चर्चा घडवून सोडविण्यात यावेत अन्यथा शिक्षकेतरांच्या मागण्यांसाठी महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांचे नेतृत्वात सोमवारी (दि.१७) पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यापासून शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष राजू रणवीर यांनी दिली आहे.
सदर मोर्चामध्ये राज्यातील माध्यमिक शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, सरकार्यवाह शिवाजी खांडेकर, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, रायगड जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष राजू रणवीर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश गावंड, राजेश वाघमारे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण ढेबे, जिल्हा मार्गदर्शक प्रदीप काळोखे,तसेच पदाधिकारी यांनी केले आहे.
शिक्षकेतर कर्मचार्यांच्या प्रमुख मागण्या
* अनेक वर्षापासून बंद असलेली माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी पदभरती भरती तात्काळ सुरु करण्यात यावी.
* चतुर्थश्रेणी कर्मचार्यांना २४ वर्षानंतर मिळणार्या लाभानुसार त्यांची वेतन निश्चिती करताना एस ४ मध्ये न करता एस ५ मध्येच करण्यात यावी.
* माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा १०/२०/३० वर्षानंतरचा लाभ तात्काळ लागू करण्यात यावा.
* माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र असणारे शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतनश्रेणी संरक्षणासह शिक्षक पदावर विनाअट पदोन्नती देण्यात यावी.
* माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला २४ वर्षाचा दुसरा लाभ हा राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा.
* महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने न करता पूर्वीप्रमाणे नियमित वेतनश्रेणीत करण्यात यावी.
* माध्यमिक शाळातील वरिष्ठ लिपीक, मुख्य लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल अतिरिक्त झाल्यास सेवानिवृत्त होईपर्यंत वेतनास व वेतनश्रेणीस संरक्षण मिळावे.
* शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, शिपाई यांच्या वेतनातील त्रुटी तात्काळ दूर करण्यात याव्यात.
* शिक्षकेतर कर्मचारी यांची अर्जित रजा साठवण्याची मर्यादा काढून टाकण्यात यावी.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx