देश महाराष्ट्र
अलिबाग : रायगड जिल्ह्यात दरोडा, घरफोड्या, चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून, चोरांवर नियंत्रण मिळविण्यात रायगड पोलीस अपयशी ठरत आहेत. २०२५ या मागील वर्षभरात जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरीचे ४४५ गुन्हे दाखल झाले असून, केवळ २९५ गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तर १५० गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट आहेत. विशेष म्हणजे दिवसभर टेहळणी करून रात्रीच्या अंधारात चोऱ्या केल्या जात आहेत. पोलिसांनी वाढवलेली गस्तही चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरोडा, घरफोडी, चोरीच्या घटनांवरून पोलिसांनी चोरट्यांच्या कार्यपद्धतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. चोरी झालेल्या परिसरात दिवसभरात काही अनोळखी लोक येऊन गेल्याची माहिती पोलिसांना स्थानिकांकडून मिळत आहे. दिवसभर शहरांसह, गावांमध्ये फिरून चोरटे बंद घरांची टेहळणी करीत आहेत. यानंतर रात्रीच्या वेळेत घरफोडी करून लाखो रुपयांचा किमती मुद्देमाल लंपास करीत आहेत. मात्र गुन्हे उकल करण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येते.
पोलिसांनी केलेल्या उपाययोजना
दरोडा, घरफोडी, चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली आहे. हद्दीत सर्वत्र पोलिस पोहोचले पाहिजेत, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात पूर्वकल्पना द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. मात्र एवढे करूनही घरफोड्यांचे सत्र सुरू आहे.
जिल्ह्याबाहेरील टोळ्या सक्रिय
जिल्ह्यात घरफोड्यांच्या घटनांमध्ये जिल्ह्याबाहेरील तसेच परराज्यातील टोळ्या सक्रिय असल्याचे मागील काही वर्षात रायगड पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून स्पष्ट होते. सकाळी चोरटे जिल्ह्यात दाखल होतात. टेहळणी करतात व रात्री चोरी करून जिल्ह्याबाहेर पशार होत आहेत. यामुळे घरफोड्यांच्या गुन्ह्यांची उकल करणे कठीण होऊन बसले आहे.
गुन्ह्याचा प्रकार : घडलेले गुन्हे : उघड गुन्हे
दरोडा : ३ : ३
जबरी चोरी : २८ : २४
चोरी : २७१ : १७३
घरफोडी: १४३ : ९५
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx