Saturday, December 27, 2025
रायगड जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये ४ हजार १५६ दुबार मतदार
रायगड जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये ४ हजार १५६ दुबार मतदार...

अलिबाग : दुबार मतदारांवरून देशात रणकंदन वाजले असताना राज्यात नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील १० नगरपरिषदांचा समावेश आहे. जिल्ह्यात निवडणूक पार पडत असलेल्या १० नगरपरिषदांमध्ये ४ हजार १५६ मतदारांची नावे संभाव्य दुबार यादीत आली आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीतील नावांमध्ये पुनरावृत्ती झालेल्या नोंदी तपासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीएलओंमार्फत तातडीने त्याची पडताळणी आली. त्यात १० नगरपरिषदांमध्ये एकूण ४ हजार १५६ दुबार नावे मतदार यादीत आढळली आहेत.

नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुकीचे पडघम वाजल्याने स्थानिक पातळीवर राजकीय रणधुमाळी सुरू झाली असली, तरी नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या विभागाला मतदार यादीतील दुबार नावांचा ताण आहे. निवडणूक आयोगाने सर्व नगरपालिका, नगरपंचायतींना संभाव्य दुबार मतदारांची यादी पाठवली आहे. निवडणुकीपूर्वी त्यांची पडताळणी करून एकाच मतदारसंघात, एकच प्रभाग आणि एकाच केंद्रावर त्यांनी मतदान करावे यासाठी यंत्रणा राबवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. यादी त्या त्या भागातील बीएलओंना दिली जाईल. बीएलओ गृहभेटीद्वारे मतदारांची पडताळणी करतील. त्यांना कोणत्याही एका मतदार संघातील, एका प्रभागातील एका केंद्रावर मतदान करता येईल. तो मतदारसंघ आणि केंद्र कोणता असेल याची निवड मतदाराने करायची आहे. त्यानुसार मतदाराकडून तसा अर्ज भरून घेण्यात येणार आहे.


दुबार मतदारांसाठी असणारे पर्याय

* दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रभागांच्या मतदार यादीत नाव असेल तर एका प्रभागाची निवड.

* एकाच प्रभागात दोन-तीन मतदान केंद्रांवर नाव असेल, तर एका केंद्राची निवड.

* वरील दोन्ही पर्यायाला मतदाराकडून प्रतिसाद नसेल, तर मतदार यादीतील नावापुढे दुबारचा शिक्का. मतदार मतदानासाठी आला, तर तेथेच त्यांचे मी या केंद्रावर मतदान करत असून, अन्य केंद्रांवर मतदान करणार नाही असे हमी पत्र लिहून घेतले जाईल,


नगरपरिषद : संभाव्य दुबार मतदार संख्या

खोपोली : ८९१

अलिबाग : २४४

श्रीवर्धन : १३१

मुरुड जंजिरा : ६९

रोहा : ६२

महाड : ३५९

पेण : ७८४

उरण : ७८१

कर्जत : ८१७

माथेरान : १८

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx