Saturday, December 27, 2025
रायगड पोलीस दलातील गैरव्यवहार प्रकरणी आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी
रायगड पोलीस दलातील गैरव्यवहार प्रकरणी आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी...

अलिबाग : रायगड पोलीस दलात सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या राजेश राम जाधव आणि पत्नी रिया राजेश जाधव या दोघांना शुक्रवारी न्यायायलात हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

 पोलीस पाटील यांची बनावट नावे टाकून मानधन बिलात  फेरफार करून हा गैरव्यवहार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस लेखा शाखा विभागातील कनिष्ठ लिपिकांसह दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयातील लेखा शाखा विभागात कनिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत असणाऱ्या राजेश राम जाधव याने २०२१ पासून जिल्ह्यातील पोलीस पाटील यांची यादी बनवून त्यामध्ये प्रत्यक्ष हजर नसलेल्या पोलीस पाटलांची बनावट नावे टाकून बनावट मानधन देयके तयार केली. सदर बनावट देयकांची दरमहा कोषागारातून मंजुरी प्राप्त करून घेतली. त्यानंतर पुन्हा या यादीमध्ये फेरफार करून दुसरी बनावट यादी तयार करून स्वतःच्या नावे ७२ लाख ३२ हजार ५०० रुपये, तर रिया राजेश जाधव या पोलीस पाटील नसताना त्यांच्या नावाचा मुदतवाढीचा खोटा दाखला बनवून त्यांच्या नावाने १ कोटी ५ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम कोषागारातून काढीत गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच हा गैरव्यवहार करताना काही पोलीस पाटील यांची नावे दुबारपेक्षा अधिक वेळा दाखवून त्यांच्या खात्यावर मानधनाची  रक्कम टाकण्यात आली आहे. याप्रकरणी राजेश जाधव, रिया जाधव ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ७ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आल्याची माहिती अलिबागचे  पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी दिली.

Get In Touch

Raigad, Alibag

+91-9673672191 contact@deshmaharashtra.in

© Desh Maharashtra. All Rights Reserved.

Designed & Developed by Securx