मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत हे तब्येतीच्या कारणामुळे दोन महिन्यांसाठी सार्वजनिक आयुष्यातून दूर राहणार असल्याची माहिती आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर जाणं किंवा गर्दीमध्ये मिसळणं यावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. कार्यकर्त्यांना त्यांनी यासंदर्भात आवाहन करणारं पत्र लिहिलं आहे.
संजय राऊत यांनी ट्विटर हँडलवरून कार्यकर्त्यांसाठी पत्रक प्रसिद्ध केलं. या पत्रात त्यांनी प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती दिली. तसेच २ महिन्यांसाठी सार्वजनिक आयुष्यातून दूर राहणार असल्याची माहिती दिली.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यांना तातडीने मुलुंड येथील फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा वैद्यकीय तपासणी करून त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. मात्र, यानंतर प्रकृतीत गंभीर स्वरूपाचे बिघाड होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. त्यांनी पत्रक प्रसिद्ध करून आपल्या आजाराबाबत माहिती दिली.
संजय राऊत यांचे पत्र
जय महाराष्ट्र
\'आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि भरभरून प्रेम दिलं. मात्र, अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं समोर आलंय. सध्या उपचार सुरू आहेत. या आजारातून मी लवकरच बरा होईन. वैद्यकीय सल्ल्यानुसार, मला बाहेर जाणे किंवा गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहे. या गोष्टीला आता नाईलाज आहे. मला खात्री आहे मी लवकर ठणठणीत बरा होईल. नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या भेटीस येईन\'.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx