अलिबाग : अलिबाग तालुक्यातील सासवणे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सहा सदस्यांना पदावरून बडतर्फ करण्याचा कोकण आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाला ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. ग्रामविकास मंत्र्यांच्या या निर्णयाचे सरपंच संतोष गावंड यांच्यासह उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थानी स्वागत केले असून, शुक्रवारी (दि.३१) सरपंच संतोष गावंड, उपसरपंच सुश्मा नाखवा यांच्यासह सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला. यावेळी आपली राजकीय कारकिर्द संपवण्याच्या दृष्टीने काहींनी प्रयत्न केला, मात्र त्यांना या निर्णयामुळे चपराक बसली आहे, मागील सहा महिन्यांपासून गावातील रखडलेली विकासकामे पूर्ण करून, पुढील कालावधीतही गावाच्या विकासासाठी सर्वोतोपरी कार्यरत राहण्याचा विश्वास सरपंच संतोष गावंड यांनी व्यक्त केला.
सासवणे ग्रामपंचायतीत आर्थिक अनियमितता असल्याची तक्रार एका ग्रामस्थाने कोकण आयुक्तांकडे केली होती. या तक्रारी अनुषंगाने कोकण आयुक्त यांनी २९ एप्रिल २०२५ रोजी निकाल देत ग्रामपंचायत सरपंच तसेच सात सदस्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय दिला होता. कोकण आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात सरपंच व सदस्यांनी राज्याचे ग्राम विकास व पंचायतराज मंत्रालयाकडे दाद मागितली होती. याबाबत ग्रामविकास मंत्रालयात सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान सरपंच व सदस्याच्या बाजूने वकिलांनी मांडलेले मुद्दे तपासून घेणे आवश्यक वाटत असल्याचे स्पष्ट करीत. कोकण आयुक्त यांनी २९ एप्रिल रोजी दिलेल्या सरपंच व सदस्य यांच्या बडतर्फी निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असल्याचा निर्णय ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.
जयकुमार गोरे यांच्या निर्णयानंतर सरपंच, सदस्य व ग्रामस्थ शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात जमा झाले. यांनतर सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी कार्यालयात जात पदभार स्वीकारला. ग्रामस्थांनी सर्वांचे स्वागत केले.
..........
ग्रामविकास मंत्र्यांनी कोकण आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. ही आम्हाला जनतेचे काम करण्याची संधी मिळाली आल्याचे मानतो. मी शेकापचा मागील २५ वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य असून, १५ वर्ष सरपंच आहे. ही कारकिर्द संपविण्याचा काहींनी प्रयत्न केला. यापुढे मागील सहा महिन्यांपासून रखडलेली विकासकामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
: संतोष गावंड
सरपंच, ग्रामपंचायत सासवणे
कोकण आयुक्तांच्या निर्णयाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारून जनतेच्या सेवेत रुजू झालो आहोत. या लढ्यात शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील, प्रवक्त्या चित्रलेखा पाटील व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. विकासकामे करण्यावर भर देऊन जनतेच्या मनात स्थान निर्माण करू.
: संजना पाटील
सदस्या, ग्रामपंचायत सासवणे
सासवणे ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांवर जे आरोप झाले होते, त्यावरून कोकण आयुक्त यांनी दिलेल्या निर्णयाला ग्रामविकास मंत्री यांनी स्थगिती दिली आहे. एकप्रकारे सर्वांना गावच्या विकासासाठी ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेली ही एक संधी आहे. मागील सहा महिन्यांपासून रखडलेली कामे पूर्ण करावीत ही अपेक्षा. तसेच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
: स्नेहल देवळेकर
महिला आघाडी अलिबाग तालुका संघटिका, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx